Thursday 19 July 2012

परसातील बाग




वाढत्या जनसंख्येला राहायला उंच इमारतींशिवाय पर्याय नाही. पण, मग शहरात भाजीपाला पिकविता येणारच नाही का? याचे उत्तर क्युबा या देशाने शोधले आहे. क्युबाकडे साखर वगळता काहीच नव्हते म्हणून हा देश आयातीवर पूर्णपणे अवलंबून होता. १९९२ साली अमेरिकेने निर्बंध घातले. अशा वेळी देशाची स्थिती पूर्णपणे ढासळायला हवी होती. पण,त्यांनी यातून मार्ग काढला. खरं तर शहरी शेतीत क्रांती घडवली. हवाना शहरात उपलब्ध असलेली प्रत्येक जागा, जमिनीचा तुकडा, गच्ची, बाल्कनी, खिडकी, जिकडेतिकडे शेतीच शेती. जिथे जे शक्य असेल ते, कुठे धान्य, कुठे फळे तर कुठे भाज्या! काही ठिकाणी वैयक्तिक तर काही ठिकाणी सामाजिक. एवढी खाद्यपदार्थांची निर्मिती व्हायला लागली की अमेरिकेची गरजच भासली नाही. क्युबाचे बघून व्हेनेझुएला, पेरू या देशांतही अशा प्रकारची शेती सुरू झाली. भारतातही डॉ. जोशींनी मुंबईत तर राठीबाई नी यशस्वीपणे शहरी शेतीचा पाया घातला. आपल्याकडेदेखील आता शहरी शेती करण्याची गरज भासणार आहे. दुसरीकडे असे चित्र आहे की पूर्वीच्या शेतजमिनीवर नवीन वस्त्या येत आहेत. त्यामुळे कमी जागेतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी खते, कीटकनाशके, तणनाशके यांसारख्या रसायनांचा अमर्याद वापर होत आहे. परिणामी उत्पन्न वाढते, पण पर्यावरणाबरोबर आपल्या आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम होतात. खरे पाहायला गेले तर आपणही अनेक ठिकाणी भाजीपाला लावू शकतो. सरकारी गृहसंस्थांच्या आवारात, गच्चीवर अगदी आपल्या खिडकीतदेखील! मी दहाव्या मजल्यावर खिडकीच्या लहानशा जागेत बरेच काही पिकविते. त्या माझ्या अनुभवातून हा लेख सादर करीत आहे. आपल्या उपलब्ध जागेत नेमके काय लावावे यासाठी जरासे नियोजन करावे लागेल. काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. भाजीपाल्याला सूर्यप्रकाशाची भरपूर गरज असते. दिवसातले चार पाच-तास तरी त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडायलाच हवा. नाहीतर झाडांची वाढ चांगली होत नाही. झाडे लांबलचक वाढतात, पण त्यांच्यात जोर नसतो. झाडांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. दुसरी बाब म्हणजे झाडे कशात लावावी? कुंड्याच विकत आणायला पाहिजेत असे बिलकूल नाही. आपण वस्तूंचा पुनर्वापर करून त्याचा कुंड्या म्हणून वापर करू शकतो. जुने डबे, मोठ्या बरण्या, प्लास्टिकच्या बादल्या याचा वापर करू शकतो. याची उंची किमान १२ इंच आणि व्यास १२ इंच असावा. झाडाच्या फुला-फळांच्या वाढीसाठी पुरेसे अन्नद्रव्य पुरवता यावे. निवळ खत-माती वापरून बाग करता येतेच, पण घरातला ओला कचरा वापरून भाजीपाल्याची जी पद्धत मी वापरते ती अशी- निवडलेल्या कुंडीला /भांड्याला खाली मोठे छिद्र पाडावे. त्यातून पाण्याचा निचरा होतो. १) छिद्रावर छोटी चपटी कपची ठेवावी. ज्यातून पाणी तर वाहून जाईल. पण माती वाहणार नाही. २) त्यावर विटांच्या तुकड्यांचा एक थर. ३) त्यावर घरातला ओला घन कचरा,भाजीची देठे, फळांची साले, चहा पावडर वगैरे. (उरलेले अन्न शक्यतो घालू नये.) ४) हा थर चार-पाच इंचाचा झाला की त्यावर कोरड्या मातीचा पातळ थर घालावा. ह्यामुळे कच-यातले पाणी/ओल खेचली जाते. कुंडीच्या उंचीनुसार असे दोन-तीन थर करता येतील. शेवटचा थर घालून त्यावर कोरडी माती अंथरून कुंडी तशीच ठेवून दिल्यास दोन दिवसांनी कचरा कुजवला असता त्यातून वासही येत नाही. थर खाली बसतात. त्यामुळे कुंडीच्या वरच्या भागात जागा तयार होईल. यात आणखी खत-माती घालून बिया पेरता येतील. मोठ्या प्रमाणात कुंड्या भरायच्या असल्यास पालापाचोळा, रसवंतीगृहातला उसाचा चोथा खालच्या थरांमध्ये घालता येईल. कुजण्याजोगा कोणताही कचरा वापरता येतो. निव्वळ कचरा वेगळा कुजवूनही त्याचे खत बनविता येते. त्याची कृती... मोठी बादली किंवा प्लास्टिकचे पिंप घ्यावे. त्याला १ सें.मी. व्यासाची ५,६ छिद्रे पाडावीत. तसेच छिद्र झाकणालाही पाडावे. झाकणाखाली जाळी ठेवावी. खालचा थर विटांच्या तुकड्यांनी भरावा व त्यावर ओलं शेण किंवा गांडूळ खत घालावे. (काही लोक यात वडाच्या झाडाखालची मातीदेखील घालतात.) मग यात रोजचा स्वयंपाक, घरातला कचरा घालावा. कोंबू नये. कचरा हवेशीर राहिला पाहिजे. ढीग व्हायला नको. कचरा कुजवताना हवा खेळती राहिली तर कधीच वास येत नाही. आपल्या कच-यात जवळजवळ ७० टक्के ओलावा असल्यामुळे बादली भरायला खूप दिवस लागतात. खालच्या खाली खत तयार होत असते. कशा लावाव्या . मग प्रश्न येतो,कोणत्या भाज्या लावाव्यात? स्वयंपाकघरात रोज लागणा-या वस्तू म्हणजे कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, गवती चहा तर असावाच. पालेभाज्या लावायला कमी जागा लागते आणि महिनाभरात त्या खुडायला तयार होतात. उत्पन्न लगेच मिळाल्याने आपला उत्साह टिकून राहतो. मेथी, पालक, कोथिंबीर, लाल माठ, शेपू या भाज्या लावणे खूपच सोपे आहे. हल्ली नवीन प्रकारचे वाण आले आहेत. जे एकदा पेरले की दोन-तीन वेळा खुडून जुड्या काढता येतात. मायाळूचा वेल लावल्यास त्याचे कोवळे कोंब आणि पाल्याचा वापर वर्षभर करता येतो. मुळासुद्धा लवकरच तयार होतो. भेंडी, वांगी, भोपळी मिरची, टोमॅटो यांसारख्या फळभाज्या लावायला अवघड नाही, पण त्यातून उत्पन्न काढायचे असेल तर ब-याच कुंड्या लागतील. वेल वाढवायला जागा असल्यास तोंडलीचा वेल लावावा. तो अनेक वर्षे भरघोस उत्पन्न देतो. भाजीपाल्याच्या बियांची पाकिटे नर्सरीमध्ये मिळतात. खरं तर आपल्या घरातच कितीतरी बिया सापडतील. धणे(कोथिंबीर), मेथी बाळंतशेपा(शेपू), लाल मिरची, चवळी, मोहरी, (सरसोंका साग) पिकलेल्या कारल्यातल्या बिया, पुदिनाच्या जुडीतल्या ४, ५ काड्या कुंडीत खोचून ठेवल्या तर बघता बघता कुंडीभर पुदिना तयार करता येईल. काही भाज्यांची रोपे तयार करावी लागतात. उदा-टोमॅटो, मिरची, वांगी यांच्या बिया पहिल्यांदा पेरून त्यांची रोपे तीन ते चार पाने आल्यावर अलगद उपटून एका कुंडीत दोनच रोपे लावावीत. रोपांची गर्दी झाली तर झाडांची वाढ नीट होणार नाही. नर्सरीत उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांपैकी सुफला किंवा संपूर्णा हे मिश्रखत पंधरा दिवसांतून एकदा अगदी कमी प्रमाणात दिल्यास झाडांची वाढ चांगली होते. पाणी घालताना पाणी खाली वाहून जाऊ देऊ नये. एक तर खाली राहणा-यांना त्याचा त्रास होतो आणि दुसरे, मातीतील अन्नद्रव्ये वाहून जातात. सुरुवातीला रोपांची पाण्याची गरज कमी असते. पण कुंडीत कधीही पाणी साचू देऊ नये. त्यामुळे मुळे कुजतात. मुळांमध्ये हवा खेळती असावी. भाजीच्या रोपावर कीड लागल्यास त्यांचं संरक्षण करण्यासाठी विकतची विषारी औषधे न फवारता घरगुतीच कडुलिंबाचे तेल, गोमूत्र, (हे औषधांच्या दुकानातही मिळते) हे वापरावे.

फलभाज्या, पालेभाज्या ताज्या आणि स्वस्त मिळण्याचे दिवस आता संपले. तुमच्या छोट्याश्या अंगणातून तुम्हाला रोज लागणाऱ्या भाज्या ताज्या आणि स्वस्तात सहज मिळवता येतील.
बाग म्हटली म्हणजे ती लहान असो, मोठी असो, त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. बागेची आवड नसणारे क्वचितच सापडतात. छोटेसे घरकुल त्याभोवती बाग असली की घराला काही वेगळेच स्वरूप येते. आवड आहे. पण जागा नाही आणि जागा आहे पण आवड नाही. असे खूप ठिकाणी आढळते. बागेची आवड असणारे मात्र डबे, बाटल्या, कुंड्यातून हे परमेश्वरांचे रूप जगवण्याचा प्रयत्न करतात. माणसांप्रमाणे झाडांतही जीव आहे. आपण झाडांवर प्रेम केल्यास ते त्याचा पुरेपूर मोबदला देते. या विषयांवर लिहावयाचे म्हटले तर खूप आहे. पण आपण नियमीत लागणाऱ्या भाज्यांचा विचार करू ऋतुमानानुसार बागेतील लागडीतही बदल करावा लागतो. हिवाळ्यात कोबी, फ्लॉवर, नवलकोल, मुळा, गाजर, टोमेटो यासारख्या भाज्या लावतात. पावसाळ्यात दोडकी, पडवळ, घोसाळी, काकडी, श्रावणघेवडा, पापडी, गवार, भेंडी, वांगी, इत्यादी तर उन्हाळ्यात भेंडी, गवार, श्रावणघेवडा, कलिंगड, इत्यादी भाज्या काढता येतात.
बागेची आणखी माहिती
दिवसातून एकदातरी झाडांजवळ जाऊन त्यांची मुलांप्रमाणे नीट देखभाल करावी. बाग म्हटली कि आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यात प्रामुख्याने जमीन, भाज्यांचे प्रकार, सुशोभन, जमिनीचे क्षेत्रफळ आणी स्वतःला असलेली बागेची आवड ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच नंतर बागेची व्यवस्थित आखणी करावी. जमीन कशी आहे, ह्यावर झाडाचे आयुष्य अवलंबून असते. जमीन मुरमाड, चिकट, चुनखडीची -कशी आहे ते पाहावे. जमीन दोनचार वेळा चांगली खणून घ्यावी. त्यातील दगड वेचून काढावे. नंतर शेणखत, नीमपेंड टाकून जमीन चांगली खुरसावी व सगळीकडे सपाट करावी. जमीनीत कोठेही खाचखळगा राहू देऊ नये. बागेत स्वच्छता ठेवणे हे महत्त्वाचे आहे. हे सर्व प्रथम थोडे खर्चाचे होते. परंतु नंतर मात्र ते फायद्याचे ठरते.
झाडांची निवड 
 झाडांची आखणी घरांच्या पुढील भागात शक्यतो फुलझाडे सीझन फ्लॉवर्स लावावी. मोगरा, जास्वंद, तगर, कर्दळ, शेवंती वगैरे, कारण यांची निगा फार राखावी लागत नाही. या प्रकारातील फुले देवाला चालणारी आहेत. या झाडांना पाणी रोज द्यावे लागत नाही. औषध मारावे लागत नाही. आठ पंधरा दिवसांनी मात्र झाडांची आळी खुरपावी. त्यात थोडासा युरिया घालावा. झाड वाढतांना एक गोष्ट मात्र जरूर लक्षात ठेवावी. झाड कोठेही, कसेही वाढते. तेव्हा त्याला आकार देऊन ते व्यवस्थित ठेवणे हे महत्त्वाचे आहे. झाडाला आकार देणे हे फुलझाडे, फळझाडे, सर्वांना लागू आहे. एकदा फुले किंवा फळे येऊन गेलेली फांदी निकामी होते. ती जर छाटली तर त्याला नवीन फुटी येतात आणि फुलाफळांचा बहर हा दुप्पट वाढतो. काही जर छाटली नाही तर ती खुरडीच राहाते.
कोणत्या भाज्या लावणे सोयीचे ?
एका कुटुंबाला वांगी, मिरच्या कढीलिंब, कोथिंबीर, आळू, टोमॅटो, लिंबू, पालेभाज्या इत्यादी भाज्यांची आवश्यकता असते. छोट्या कुटुंबाला चार ते सहा, वाग्यांची व मिरच्यांची झाडे, एक कढीलिंबाचे, एक लिंबाचे, एक दोन केळीची, केळीच्या खाली अळूची झाडे असल्यास  पुरेशी होतात. वांच्याच्या झाडाभोवतीच्या आळ्यावर कोथिंबीर, मेथी किंवा मुळा ह्यांसारख्या पालेभाज्या घ्याव्यात. चने व मेथी दर आठवड्याला टाकली तर नियमित पणे मिळते. मिरची व वांगी यांची झाडे वर्षभर टिकणारी आहेत त्यामुळे त्यांच्या आळ्यांवर पालेबाजी होऊ शकते. ह्या झाडांवरील पीक निघून गेल्यावर त्या झाडांना छाटून टाकावे. थोडेसे खत घालावे. म्हणजे नवीन बहर येतो. लिंबाचे झाड थोडे मोठे होते. त्यामुळे जागा असली तर ते लावावे कढीलिंब कुंडीतही होऊ शकतो. भोपळा व वेलभाज्या हे घरावर, गॅलीवर चढवून त्याचे पीक घेता येते. तोंडली कंपाऊंडच्या तारेवरही होऊ शकतात. अर्थात हे मात्र शेजाऱ्यावर अवलंबून आहे.

स्वकष्टाच्या भाजीची चव आगळीच
हे सर्व कागदावर लिहिणे सोपे आहे. परंतु प्रत्यक्ष करताना मात्र थोडे अवघड आहे. थोडे समजू लागले की मग त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. एकदा स्वतःच्या बागेतील भाजी खावयाची सवय झाली की मग बाजारातील भाजी शिळी, जून असे उद्गार तोंडावाटे नकळत बाहेर पडतात हे सर्व करताना लागणारे कष्ट, खत, बियाणे, मिळणारे उत्पन्न ह्याचा विचार करावा. भाजी विकत आणली असे समजून त्याचे पैसे पेटीत टाकावे. म्हणजे त्यापैशातच झाडांसाठी लागणारे कत, औषधे यांचा खर्च पुरा होतो की नाही, हे कळून येते. घरात निघणारा भाजीचा कचरा, उष्टे खरकटे, पालापाचोळा हा वाया न घालवता तो ३ बाय ३ बाय ३ फूटांचा खड्डा करून त्यात टाकावा. ह्याचे सुंदर कंपोष्ट खत तयार होते. त्यामुळे आपल्यला कचरा लांबवर न्यावा लागत नाही. व घाणही येत नाही. ह्यासाठी घरामागील कोणताही कोपरा निवडला तरी चालेल.
गवार, भेंडी, श्रावणघेवडा अशा भाज्याचे बियाणे जागेवरच लावावे. वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी फ्लॉवर अशा भाज्यांची रोपे गादी वाफ्यात करावी. ही रोपे तयार होईपर्यंत जागा मशागत करून, खत टाकून तयार ठेवावी रोपे तयार होण्यास साधारणपणे ३० दिवस लागतात. वेलीभाज्या लावल्यानंतर त्या एक महिन्यात मांड्यावर जातात. भाज्यांची रोपे किंवा बिया लावल्यानंतर १५ दिवसांनी त्याला तीन बोटात राहील एवढा युरिया, झाडाभोवती चार बोटांचे अंतर ठेवून, सर्कल करून टाकावा म्हणजे झाडाची वाढ लवकर होते. नंतर १५ दिवसांनी थोडे मिश्र खत संपूर्णावरील पद्धतीनेच एक टेबलस्पून घालणे. थोडे दिवसांणी परत झाडाची खुरपणी करून हा वरखताचा डोस द्यावा. नंतर मात्र खत घालू नये. झाडे लावण्यापूर्वी जमीनीत शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळावे. वरखतांमध्ये सुफला. संपूर्णा पोटॅश किंवा युरिया यासारखी खते येतात.
औषधे वापरल्यास नियमित दोन औषधांचा वापर करावा. औषध दर आठवड्याला नियमितपणे मारावे. ह्यासाठी सोपा उपाय म्हणजे शेणीची राख भुरभुरावी, तंबाखूचे पाणी , गोमूत्र ह्याचा पंपाने स्प्रे करावा. म्हणजे औषधापासून होणारा त्रास वाचेल. परंतु जर अगदीच इलाज चालला नाही तर मात्र रोगोर किंवा मॅलेथीऑन वापरावे किंवा कोरडे गंधक वापरावे. सध्याच्या दिवसात बाजारात मिळणाऱ्या भाज्या अतिशय महाग तर असतातच शिवाय त्या शिळ्या सडक्या, जूनही असतात. ताज्या भाज्या मिळणं हा एक आनंद आहे आणि ताज्या भाज्या खाणं हे आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यकही अहे. तेव्हा आपल्या छोट्याशा परसात चारदोन प्रकारच्या भाज्या लावल्यात तर हा आनंद आणि आरोग्य तुम्हाला निश्चितच मिळत राहील.


------------- दैनिक एकमत 


No comments:

Post a Comment